Lek Ladki Yojana : शासनामार्फत माहे मार्च, २०२३ मध्ये वा त्यादरम्यान मुलींच्या सक्षमीकरणाकरीता लेक माझी लाडकी या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली असून, यात पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असा एकूण प्रत्येक मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
तसेच दिनांक १ एप्रिल, २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार असून दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेणार असून, निधीअभावी या योजनेची अदयापही अंमलबजावणी करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय, असल्यास, शासनाने यासंदर्भात निर्णय घेऊन व निधीची तरतूद करुन या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न विधानपरिषद माननीय सदस्यांनी उपस्थित केला होता.
लेक माझी लाडकी योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, किती मिळणार लाभ?
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लेक लाडकी या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या १ अथवा २ मुलींना तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.
याशिवाय दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगी अथवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. शासन निर्णय दिनांक ३० ऑक्टोबर, २०२३ अन्वये सदर योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधिनस्त क्षेत्रिय यंत्रणांना योजने संदर्भात अर्ज स्वीकारण्याबाबत कळविण्यात आले असून, योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली आहे.
तसेच या योजनेकरीता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले असून त्या अंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे.